। अहमदनगर । दि.20 जानेवारी ।कर्जाला कंटाळून ससेवाडी (ता. नगर) येथील शेतकरी दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
मगर यांच्याकडे सेवा सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. सात एकर क्षेत्र नावावर आहे. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली नैसर्गिक आपत्ती व कोरोनाच्या महामारीमुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत.
ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पिके वाया गेली.
कांदा लागवडीसाठी मोठा खर्च येत असून खराब हवामानामुळे कांदा पिक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांदा लागवडीसाठी उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने मगर यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.