। अहमदनगर । दि.20 जानेवारी । सावेडीतील तपोवन रस्त्यावरील भिस्तबाग महल परिसरातील दुकानात चोरट्यांनी चोरी करीत दुकानाच्या गल्ल्यातील 8 हजार 500 रूपयांची रक्कम चोरून नेली. ही घटना दि.19 ते 20 जानेवारी दरम्यान घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी राहुल केशव वाकळे (रा. सावेडी गाव, संघर्ष चौक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
वाकळे हे त्यांचे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामानाची उचकापाचक करून दुकानाच्या गल्ल्यातील 8 हजार 500 रूपयांची रक्कम चोरून नेली.
वाकळे हे दुसर्या दिवशी दुकानात आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत या घटनेची फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक मुटकुळे करीत आहेत.