। अहमदनगर । दि.20 जानेवारी । खासगी सावकारीच्या संशयावरून नारायण सीताराम कडू (रा. देवळाली प्रवरा) यांच्या देवळाली प्रवरा येथील राहत्या घरावर व राहाता येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत दुकानावर अशा दोन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला.
त्यात त्यांच्या घरातून एक खरेदी खत व पन्नास हजाराची रोकड जप्त केली आहे, अशी माहिती राहुरीचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) दीपक नागरगोजे यांनी दिली.
घरात सापडलेल्या एका खरेदी खताच्या आधारे सुनावणी घेतली जाईल. पुढील कारवाई केली जाईल. पथक प्रमुख नामदेव खंडेराय, संतोष वासकर, संजय बनसोडे, माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, देवळाली प्रवरा येथे बुधवारी (ता. 12) संतोष भानुदास कदम (वय 33, रा.देवळाली प्रवरा) या तरुण शेतकर्याने एका सावकाराच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर दोन दिवसांनी तो शुद्धीवर आला.
मात्र, या प्रकरणाचा नुकत्याच झालेल्या छापेमारीशी संबंध नसल्याचे चौकशीत समोर आले असल्याचे सहाय्यक निबंधक नागरगोजे यांनी सांगितले आहे.