। अहमदनगर । दि.23 जानेवारी । पारनेर नगरपंचायतीच्या निकालानंतर कोण सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरु होती. सुरवातीला शिवसेना सत्ता स्थापन करेल, असे वाटत असतानाच राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी बाकावर बसणार असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सात, शिवसेनेने सहा तर शहर विकास आघाडीला दोन, भारतीय जनता पक्षाला एक व अपक्ष एक अशी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.
त्रिशंकू स्थिती झाल्याने निकालानंतर लगेचच राजकीय घडामोडीना वेग आला होता. राष्ट्रवादी व शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची समान संधी होती. परंतु राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी रात्रीतून सूत्रे फिरवली. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठला आहे.
निकानंतर दुसर्या दिवशी शहर विकास आघाडीतर्फे निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार लंके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्या नंतर लगेचच शहरविकास आघाडीचे दुसरे नगरसेवक भूषण शेलार यांनीही त्याच दिवशी पक्षात प्रवेश केला.
या दोन्ही प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे बहुमत तयार झालेले आहे. तशी गटनोंदणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे. त्याच दिवशी आमदार निलेश लंके यांनी आणखी काहीजण आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या योगेश मते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अद्याप नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नाही. तोच राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरपंचायतीत 10 नगरसेवक झाले आहेत.
शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत तोच आता अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रभाग तीनमधील सदस्य मते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला आहे. आता भाजपाचे नगरसेवक कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.