। रायगड । दि.25 जानेवारी । सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या काळात शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचे आरोपी भाजप आमदार नितेश राणे सोमवारी कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले.
त्या वेळी तब्बल दीड तास त्यांची चौकशी करण्यात आली. परब हल्ल्यांतील प्रकरणात अटक टाळण्यासाठी नितेश यांनी प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो फेटाळला गेला.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, सोमवारी त्यांची तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दीड तास चौकशी केली. चौकशीचा तपशील देण्यास हुंदळेकर यांनी नकार दिला.
नितेश राणे गुन्ह्याच्या कामी पोलिस ठाण्यात हजर आले अाहेत,एवढीच माहिती हुंदळेकर यांनी दिली. यावेळी नितेश यांच्यासोबत त्यांचे वकील संग्राम देसाईही उपस्थित होते.