। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । नगर शहरातील आनंदनगर, आगरकरमळा भागात पंधरा दिवसांपासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. दुषीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांत या भागात स्वच्छ पाणी द्यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच दूषित पाण्याने महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठ्याच्या अधिकार्यांना अंघोळ घालणार आहे, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.
भुतारे म्हणाले, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते यांच्याशी तसेच सहाय्यक अभियंता राहुल गीते यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून दुषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आग्रही मागणी केली, परंतु आजपर्यंत स्वच्छ पाणीपुरवठा झालेला नाही.
त्यामुळे आता जनतेचा संयम संपलेला असून यापुढे जर दोन दिवसात दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच दूषित पाण्याने महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठ्याचे संबंधित अधिकारी अभियंता यांना आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही. या भागातील नागरिकांबरोबर आयुक्तांच्या दालनात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर, आमदार यांनी संबंधित भागाला भेट दिली नाही, हे दुर्दैव आहे.
Tags:
Ahmednagar