मण्यार जातीचा एकच साप चावल्याने भाऊ-बहिणीचा लागोपाठ दुर्दैवी मृत्यु

। सांगली । दि.18 ऑक्टोबर । खानापूर तालुक्यातील आळसंद येथे मण्यार जातीच्या एकाच विषारी सापानेदंश केल्यानंतर भावासह बहिणीचा लागोपाठ मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना खानापूर तालुक्यातील आळसंद येथे घडली आहे. या दोघा भाऊ-बहिणीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विराज सुनिल कदम आणि सायली जाधव अशी मृत्यूमुखी पडलेल्या बहिण- भावांची नावे आहेत. विराज याला 6 ऑक्टोबर रोजी घरी झोपेत असताना मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला होता. यात सकाळपर्यंत त्याला काय झाले हे कुटुंबाला न समजल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला.

विराजच्या रक्षाविसर्जन विधीसाठी त्याची विवाहित बहिण सायली जाधव या माहेरी आल्या होत्या. विराज याच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता. गुरूवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायली यांनाही दंश केला.

तत्काळ सायली जाधव यांना विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. परंतू गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणार्‍या सायली यांचीही प्रकृती दोन दिवसात बिघडली.

अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान सायली यांचाही मृत्यू झाला. सायली जाधव यांना एक वर्षांची मुलगी आहे. आईला सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी आहे. आईला भेटण्यासाठी ती आतूर झाली असून दररोज हंबरडा फोडत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post