ऑनलाईन अध्यापनापासून वंचित मुलांची घेणार माहिती : जिल्हा परिषद शिक्षण समितीचा निर्णय

। अहमदनगर । दि.24 सप्टेंबर । ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सर्व विद्यार्थी सामावून घ्यावेत तसेच जे विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन प्रकियेपासून वंचित आहेत त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण समितीने माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा नुकतीच झाली. यात शिक्षण विभागाकडील योजनांचा आढावा तसेच शिक्षण विभागांतर्गत बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे तसेच मार्गदर्शन वर्ग, विषय वाटप करुन उद्दिष्ट निश्चित करावीत. स्वाध्याय उपक्रमात जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळा व अनुदानीत माध्यमिक, खासगी प्राथमिक शाळांचा शंभर टक्के सहभाग असावा असे सांगण्यात आले. 

सभेत सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, विमलताई आगवण, गणेश शेळके आदीनीं चर्चेत सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post