डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घ्या, मनपाचे आवाहन

 

। अहमदनगर । दि.20 सप्टेंबर । अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की,सध्या डासांमार्फत पसरणार्‍या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.आठ दिवसापेक्षा  जास्त दिवस पाणी उघडे किंवा साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात.अंड्याच्या आळ्या टायर होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदा.बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे, इ. दर आठवड्याला स्वच्छ कोरडे करून पुन्हा भरावे.

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,चादर,धोतर यांनी बांधून झाकून ठेवावी म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.घराच्या गच्चीवर, अंगणात, आजूबाजूच्या परिसरात कोठेही पाणी साचू देऊ नये.

भंगार समान उघड्यावर टाकू नये उदा.टायर्स,प्लॅस्टिक समान,कुंड्या, टाकाऊ वस्तू इ. आशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कुलर्स,फ्रिजच्या पाठी मागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.

लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अश्या प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य होईल., असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनासंबंधीही सावधानता : कोरोनाचा तिसरा उद्रेक होण्याची शक्यता अद्याप मावळलेली नाही. ऑक्टोबरच्या मध्यात हा तिसरा उद्रेक होऊ शकतो. सध्या सणासुदीचा कालावधी असल्याने गर्दी टाळणे अशक्य होत आहे. या स्थितीमुळे तर तिसऱया उद्रेकाचा धोका आणि संभाव्यता जास्तच वाढते. म्हणून सर्व राज्यांनी आरोग्य सेवा सज्ज ठेवावी. रुग्णालये आणि औषधोपचार यांची व्यवस्था आतापासूनच चोख ठेवावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आले आहे. अन्य देशांचा अनुभव लक्षात घेता हा तिसरा उद्रेक जास्त व्यापक असू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त  पूर्वतयारी करुन ठेवावी, असेही सुचविण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post