विविध मागण्यासाठी कुकडी लाभधारक शेतकर्‍यांच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन


। अहमदनगर । दि.30 सप्टेंबर ।  महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने काल श्रीगोंदा  तालुक्यात आले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या परिसंवाद कार्यक्रमामध्ये जाऊन पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी डिंबा धरणातून येडंगाव धरणात बंदिस्त पाइपलाइन करून पाणी आणावे.डिंबा ते माणिकडोह बोगद्याचे कामास गती द्यावी.कुकडी कॅनॉल हा बारमाही करावा व कुकडी कॅनॉलसाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा.या मागण्यांचे निवेदन ना.जयंत पाटील साहेब यांना दिले.

हे देखील वाचा....जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात कोणत्या तालुक्यात किती कोरोना बाधित....वाचा सविस्तर

निवेदनात म्हस्के यांनी म्हटले आहे की,कुकडी लाभधारक शेतकर्‍यांना पाण्यासाठी कायम संघर्ष करावा लागत आहे.धरणे शंभर टक्के भरले तरी आम्हांस मात्र आठ माहीचे चार रोटेशन अद्याप मिळाले नाहीत.जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी धरणात पाणी असून सुद्धा पाणी अभावी पिके जळून गेलेली आहेत.त्यामुळे आठमाही कुकडी कॅनॉल बारमाही करण्यात यावा.

तसेच डिंभा ते येडगाव याच्यावर जलसंपदाचे सिंचन क्षेत्र असल्यामुळे येडगावमध्ये पाणी असून सुद्धा अडचणी येतात व तो कॅनॉल पुर्ण क्षमतेने वाहणेसाठी योग्य नाही.600 क्युसेसने पाणी सोडले नंतर येडगाव धरणात ते 100क्युसेसने पोहचते,पाण्याची अनेक ठिकाणी गळती व चोरी होवून पाणी वाया जाते, त्यामुळे डिंबा धरणातून येडंगाव धरणात बंदिस्त पाइपलाइन करून पाणी आणावे.

त्याचप्रमाणे डिंभा धरणातून माणिकडोह धरणामध्ये पाणी आणणे साठी बोगदा कामास गती देण्यात यावी कारण माणिकडोह धरण कधीच 100 टक्के भरत नाही.डिंभा धरण लवकरच ओव्हरफ्लो होते व ते नदीवाटे खाली सोडण्यात येते.ते पाणी बोगद्याद्वारे माणिकडोहात येवू शकते व कुकडी कॅनॉल बारमाही होवू शकतो.

तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कॅनॉल वरील डि.वाय.13 व 14 चारीसाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला तातडीने मिळण्यासाठी त्वरीत कारवाई करणेत यावी. या सर्व विषयांवर लक्ष घालून तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती राजेंद्र म्हस्के यांनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांना केली.

Post a Comment

Previous Post Next Post