मेडीकल दुकान फोडून चोवीस हजाराची चोरी


। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । दुकानाच्या शटरचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक करुन आतील चोवीस हजार रुपये किमतीचा झंडू बामचा बॉक्स, आयोडेक्स बामचा बॉक्स, कॅडबरीचे दोन बॉक्स, ओमेडी एक बॉक्स असा माल चोरुन नेला. 

ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरात शिदणकर हॉस्पिटल शेजारील मेडीकल दुकानात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सुनील सोपान मोहळकर (वय 49, राहणार बेलवंडी, तालुका श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार बारवकर करीत आहे. 

शस्राचा धाक दाखवून सव्वा लाखाची चोरी

। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । लोखंडी टॉमी व चाकू या घातक शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी सोपान ढाळे यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली. घरातील कपाटातील एक लाख तेवीस हजार रुपये किमतीची रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे घडली. 

या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी शिवाजी ढाळे (राहणार दुलेचांदगाव, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर चव्हाण, जावेद चव्हाण, किशोर काटे (तिघे राहणार पाथर्डी) यांच्या विरुध्द जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक रोकडे करीत आहे.


वाळूची वाहतूक करणारा डम्पर वाळूसह पकडला

। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. ही कारवाई जामखेड तालुक्यातील खडकत येथे केली. 

या कारवाईत पोपट दिलीप हळनोर (वय 32 ), योगेश केशव पवार (दोघे राहणार जामखेड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा हायवा ट्रक (क्रमांक एमएच चौदा इएम 3891) व आतील पाच ब्रास वाळूसह जप्त केला.

 या प्रकरणी पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल पाथरुट यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंगले करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post