वृक्ष संवर्धनाचे कार्य आपल्यासह भावी पिढीसाठी वरदान : पोपटराव पवार

। अहमदनगर । दि.12 सप्टेंबर । ग्लोबल वार्मिंगच्या संकटाची चाहुल सर्व जगाला लागल्यामुळे जागतिक पातळीवर हे संकट रोखण्यासाठी विविध उपाय योजना अंमलात आणण्यात येत आहेत. यासाठी पॅरिस करारही करण्यात आला असून, प्रत्येक देशांवर काही निर्बंध टाकून,त्यांना जबाबदारी व कर्तव्यांची जाणिवही करुन देण्यात आलेली आहे. 

पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज झाल्याने आपल्या देशात ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेल्या या चळवळीमुळे अनेक फायदे आता दिसू लागले आहेत. त्यामुळे युवकांबरोबरच सर्वजण वृक्षसंवर्धानाच्या कार्यात देत असलेले योगदान हे आपल्यासह भावी पिढीसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

गौरव नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शगांव हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबापाटील सोनवणे,प्रदिप डोमे,निलेश गुंजाळ आदिंसह गौरव नरवडे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी गौरव नरवडे म्हणाले, पद्मश्री पोपटराव पवार यांचे पर्यावरण रक्षणातील कार्य मोठे असून, त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही युवक वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करुन त्यांचे संर्वधन करत आहोत. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी प्रत्येक गावो-गावी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post