बँक फसवणूक प्रकरणातील दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

। अहमदनगर । दि.20 जुलै ।  कर्जाची परतफेड केल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या सावेडी शाखेची 5 कोटींची फसवणूक करणारे आरोपी भारत अशोक मवाळ व मृदुल अशोक मवाळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. बाकरे यांनी फेटाळला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल केदार गोविंद केसकर यांनी काम पाहिले.



सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करतेवेळी त्यांनी आरोपीकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे अफरातफर केलेली रक्कम हस्तगत करायची असून आरोपींना मदत करणार्‍या इतर आरोपींना अटक करून बनावट कागदपत्रे कशी तयार केली, त्याकामी कोणी मदत केली, याबाबत तपासी अधिकारी यांना सखोल चौकशी करायची असल्याने पोलिस कस्टडी हवी असल्याबाबत न्यायालयास सांगितले होते.

 

 या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडेे करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य, आरोपींचा फसवणूक करण्याकामी असलेला प्रत्यक्ष सहभाग व मोठ्या रक्कमेची फसवणूक याबाबी लक्षात घेवून न्यायालयाने मवाळ बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Post a Comment

Previous Post Next Post