। अहमदनगर । दि.19 जुलै । मारुती कारच्या धडकेत पती ठार झाला व पत्नी जखमी झाली. भरधाव वेगातील मारुती ओमिनी कारने रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील पती ठार झाला तर पत्नी जखमी झाली.
त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. ही घटना निंबळक बायपास रोडवर साईबनकडे जाणार्या कच्च्या रोड समोर घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, नागेश विश्वंभर कदम (वय 40, राहणार गिरणा साखर कारखाना, दाभाडी गाव, श्रीरामनगर, मालेगाव, नाशिक) हे त्यांची पत्नी सविता (वय 39) यांच्यासह मोटारसायकलने निंबळक बायपास रोडने साईबनकडे जात असताना
भरधाव वेगात आलेल्या मारुती ओमिनी कारने (क्रमांक एमएच 15 ईबी 1396) पुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत नागेश कदम हे ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. या धडकेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच मारुती कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहे.
