। शिर्डी । तुषार महाजन । दि.20 जुलै । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१ ते शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ या काळात श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर याही वर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.
श्री.कान्हूराज बगाटे म्हणाले, गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे श्रीं चे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये दि.१६ नोव्हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले होते. परंतु सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.
यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.०५ एप्रिल २०२१ रोजीपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्तांना बंद ठेण्यात आलेले आहे. त्यामुळे दि.२२ जुलै ते दि.२४ जुलै २०२१ याकालावधीत साजरा करण्यात येणारा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०५.३० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी श्री साईसच्चरित अखंड पारायणाकरीता व्दारकामाई मंदिर आतील बाजुने रात्रभर खुले ठेवण्यात येईल.
उत्सवाच्या मुख्य दिवशी शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी शनिवार दिनांक २४ जुलै रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.०० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.३० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. तसेच उत्सव कालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये व संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन ही बगाटे यांनी केले.
