पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम, शेतकर्यांना दिलासा
। अहमदनगर । दि.22 जुलै । नगर जिल्हयातील दोन महत्त्वाची धरणे असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा व अकोले तालुक्यामधील भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील जनतेला दिलासा मिळू लागला आहे. या दोन्ही धरणांपैकी मुळा धरण 40 टक्के भरले असून भंडारदरा धरण जवळपास 50 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कामय असल्याने धरणांतून नव्या पाण्याची आवक सुरु आहे.
उत्तर नगर जिल्हयाला वरदान असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणित वाढू लागला आहे. मागील 12 तासांत 192 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने या धरणातील पाणीसाठी 5275 दलघफू झाला आहे.
पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास या धरणातील पाणीसाठा 11 हजार दशलक्ष घनफुट या क्षमतेचा निम्मा म्हणजे सुमारे साडेपाच हजार दशलक्ष घनफूट होणार आहे. मध्यंतरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. मात्र तीन ते चार दिवसांपासून पावसाची सततची संततधार असल्याने पाणीसाठा वाढला आहे.
मुळा धरणाच्या पालोटात असलेल्या कोतूळ, हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे मुळा नदीतील पाणीपातळी 5000 क्युसेकच्या पुढे गेली होती. धरणात पाणी येण्यास उशीर लागत असल्याने सायकाळी धरणत 2568 क्युसेकने आवक वाढेल असे सांगण्यात आले. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात आता 10401 दशघफू पाणीसाठा आहे.
