निवड श्रेणी करिता प्रशिक्षण तात्काळ आयोजित करण्याची मागणी
शिक्षक परिषदेची मागणी ; शिक्षण मंत्र्यांना निवेदन
। अहमदनगर । दि.22 जुलै । राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी कार्यरत शिक्षकांपैकी 20 टक्के शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याची अट न ठेवता 24 वर्षे सेवा झालेल्या सरसकट सर्व शिक्षकांना निवडश्रेणी द्यावी व निवड श्रेणी करिता प्रशिक्षण तात्काळ आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे व उपाध्यक्ष प्रकाश मिश्रा यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याकरिता शिक्षक परिषद राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. राज्यात कार्यरत शिक्षकांपैकी 20 टक्के शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याची अट न ठेवता 24 वर्षे सेवा झालेल्या सरसकट सर्व शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात यावी, तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी करिता आवश्यक असणारे प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने लावून धरली आहे. निवड श्रेणी करिता मे 2021 मध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी अगोदरच नावे मागवण्यात आली होती. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार दहा-वीस-तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी कायम आहे.
ही योजना लागू करण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे काय झाले याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे दहा-वीस-तीसची आश्वासित प्रगती योजना लागू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने देय असलेली वरिष्ठ व निवड श्रेणी मिळावी. तसेच दहा-वीस-तीस ही योजना लागू करण्यासंदर्भातील नेमलेल्या समितीचे आलेल्या अहवालानुसार ताबडतोब सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, अशोक झिने, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे,
सौ. अनिता सरोदे, शुभांगी थोरात, विनिता जोशी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, संदीप झाडे, राहुल ज्योतिक, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, जालिंदर शिंदे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.
