गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पर्स चोरीला

। अहमदनगर । दि.21 जून । नगर शहर अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी संधी साधत नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारल्याच्या घटना घडत आहेत. कापड बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना कापड बाजारातील कोहिनूर कापड दुकानासमोर घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रिया वाल्मिक वाघ (वय 40, फॅसोलोसा हाईटस, फ्लॅट नंबर 401, बाणेर, पुणे. हल्ली राहणार ताराबाग हौसिंग सोसायटी, नगर-पुणे रोड, केडगाव) या कापड बाजार येथे काही खरेदी करण्यासाठी आल्या असताना व कोहिनूर कापड दुकानासमोरील गर्दीत सामान खरेदी करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने

त्यांची कापडी पर्स, आतील विवो कंपनीचा मोबाइल, रोख रक्कम असा बारा हजार सहाशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रिया वाघ यांनी आरडाओरडा करून चोराचा शोध केला. परंतु तोपर्यंत चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post