। अहमदनगर । दि.09 जून । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले.
बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले आहे. तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच आरोपी बोठे याला मदत करणार्या 25 जणांचे जबाब काल दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नोंदविण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकत्र्या रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. त्यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींविरूद्ध पारने रच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
बोठे याला 102 दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली. या अटकेला येत्या 10 जून रोजी 90 दिवस पूर्ण होत आहेत. आरोपी बाळ बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला.
