शहराच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली : आ.संग्राम जगताप

अडथळ्यांची शर्यत पार करीत 

अमृत योजना कार्यान्वित होणार

आमदार जगताप यांच्या प्रयत्नांना यश

नवीन टाकीचे उद्घाटन संपन्न


। अहमदनगर । दि.21 जून । शहराच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी अमृत योजनेचा प्रस्ताव आम्ही तयार केला. त्यानंतर केंद्र सरकारकडे मी व मनपाने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न सुटणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविली जाणारी अमृत योजना कार्यान्वित होत आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.

जलवाहिनीच्या मार्गावर अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी असून, त्यांच्याशी वेळोेवेळी चर्चा करून बैठका घेऊन लाईन पुढे नेण्याचा मार्ग मोकळा करून दिला.  वसंत टेकडी येथील योजनेंतर्गतच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, दुसरी टाकी दुरुस्ती सुरू असून, तीही कार्यान्वित होईल. त्यामुळे आता शहराचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली निघणार असून, नगरकरांना मुबलक व पूर्ण दाबाने पाणी मिळू शकणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गतच्या वसंत टेकडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मनपा उपायुक्त डांगे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम, इंजि. सातपुते, नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, सुनील त्रिंबके आदींसह अधिकारी उपस्थित होते.

आ.जगताप म्हणाले की, नवीन टाकीद्वारे पाणी देण्याचे काम आता सुरू होत आहे. योजनेंतर्गतच्या टाकीचे उद्घाटन येथे आज संपन्न झाले असून, महिनाभरात टप्प्याटप्प्याने योजनेंतर्गतची कामे पूर्ण होतील. आता नगर शहरातील नागरिकांना दुप्पट पाणी मिळू शकणार आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आहे. मुळानगर ते विळद व विळद ते वसंत टेकडी या भागातील शेतकर्‍यांनी काही कामे अडवली होती. शेतातून जलवाहिनी नेण्यास त्यांचा विरोध होता. त्यांच्याशी चर्चा करून बैठका घेऊन जलवाहिनी नेण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

Post a Comment

Previous Post Next Post