। अहमदनगर । दि.23 मे । महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अहमदनगर शहारातील आठ हॉस्पिटलमधून कोरोना उपचाराचे पैसै परत मिळवून देणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी सांगितले. मनसेनेच्या वतीने सर्वसामान्यांसाठी या मोहिमेस सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांनी भरलेली बिले व पैसे हे त्यांना मनसे परत मिळवून देणार आहे, असे सांगून भुतारे म्हणाले, नगर शहरातील आठ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना ही बिले परत मिळवून देण्याचा प्रयत्न असून, यासाठी त्यांनी एक अर्ज भरून उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमधील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील काम करणार्या आरोग्य मित्रांकडे तो अर्ज जमा करावा तसेच त्या अर्जासोबत हॉस्पिटल, लॅब, मेडिकल, सिटी स्कॅन, एमआरआय बिले तसेच आधारकार्ड, केशरी-पिवळे-पांढरे शुभ्र यापैकी जे असेल त्या रेशनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी तसेच वैद्यकीय उपचारांची व औषधांची सर्व बिले जोडावीत. उपचाादरम्यान ऑक्सीजन लेव्हल ही 94 पेक्षा कमी आहे, अशा रुग्णांनी अर्ज करावा, असे सांगून भुतारे म्हणाले,
अहमदनगर शहरातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आठ हॉस्पिटल असून, त्यामध्ये एशियन नोबेल हॉस्पिटल (प्रेमदान चौक, सावेडी), साईदीप हॉस्पिटल (तारकपूर), स्वास्थ्य हॉस्पिटल (अण्णाभाऊ साठे चौक, लालटाकी), नाईक पेडीट्रिक हॉस्पिटल (सावेडी), विखे पाटील मेमोरियल अँड मेडिकल कॉलेज (विळद घाट), गरुड हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर (सावेडी रोड), आनंदऋषीजी हॉस्पिटल (सक्कर चौक, कोठी रोड) व अनभुले हॉस्पिटल (प्रेमदान चौक, सावेडी) यांचा समावेश असून, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून भरलेल्या बिलांची रक्कम परत मिळवून देणार असून, अर्ज जमा करताना हॉस्पिटलच्या माध्यमातून काही कारणे सांगून दिशाभूल केली जाऊ शकते.
त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज जमा करावा व त्या अर्जाच्या झेरॉक्स प्रतवर रुग्णालयाकडून पोहच घ्यावी व त्याची एक प्रत मनसेकडे जमा करावी, असे आवाहन भुतारे यांनी केले आहे. रुग्ण जर बाहेरगावी राहत असेल तर त्यांनी त्यांच्या अर्जाची पोहोच प्रत त्या तालुक्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्ष वा तालुकाध्यक्ष यांच्याकडे जमा कराव्यात. अधिक माहितीसाठी 7304612121 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन भुतारे यांनी केले आहे.
