सूर्यमुखी प्रतिष्ठानने दिला गरजूंना दिलासा ; 251 कुटुंबांना केले किराणा वाटप

। अहमदनगर । दि.23 मे । येथील श्रीसूर्यमुखी गुरुदत्त युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने 251 गरजू कुटुंबांना किराणा वाटप नुकतेच करण्यात आले. गरजू लोकांची मदत करणे, हीच आमची समाजसेवा व ईश्वरसेवा असल्याची भावनाही यावेळी प्रतिष्ठानद्वारे व्यक्त करण्यात आली.

दातरंगे मळा येथील दत्त कॉलनीत सूर्यमुखी गुरुदत्त मंदिरात महाआरती करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दानशूर व्यक्तींच्या मदतीने या साहित्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, मीठ साखर, चहा, मसाला, तिखट मिरची, हळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा यात समावेश आहे. 


दातरंगे मळा, शिवाजीनगर, नालेगाव, तोफखाना, चितळे रोड, स्टेशन रोड, नित्यसेवा, श्रमिक नगर, पाईपलाईन रोड  या भागातील गरजू लोकांना किराणा साहित्यांचे 251 किट वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी 113 दानशूर व्यक्तीने मदत केली, असल्याचे संयोजक दीपक गुंडू यांनी सांगितले.

देशात आणि राज्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले असून, सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, अशा गरजू लोकांची मदत करण्याच्या हेतूने मित्रांमध्ये चर्चा झाली. 

गरजू लोकांचे काय होत असेल, ते कसे राहत असतील, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या चर्चेतून श्री सूर्यमुखी गुरदत्त युवा विकास प्रतिष्ठानच्वतीने किराणा साहित्य वाटप करायचा निर्णय घेतला. त्यानंतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने प्रतिष्ठानच्यावतीने 251 कुटुंबांना 15 दिवस पुरेल असा किराणा साहित्य वाटप करण्यात आले. या सेवेच्या कार्यात प्रत्यक्ष वाटप शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे ताटी म्हणाले की, 50 गरीब गरजवंतांच्या घरात किराणा सामानाचे वाटप करण्याचे ध्येय ठेवून कामाला सुरुवात केली, पण दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे 251 गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले. या भयानक परिस्थितीमध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने  प्रतिष्ठानच्यावतीने हे काम करण्यात आले, असे ते म्हणाले.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिर, गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप, सायकल वाटप, समाज प्रबोधन कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post