टायर फुटून पेट्रोलच्या टँकरला आग

। शिरवळ । दि.21 एप्रिल ।येथील फुलमळानजीक पुणे-सातारा  महामार्गावरून पुणेकडून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या सुमारे 25 हजार लिटर क्षमता असणार्‍या पेट्रोलच्या टँकरचा टायर फुटून अचानक पेट घेतल्यामुळे एकच तारांबळ उडाली. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पांडुरंग हजारे यांनी वेळीच तत्परता दाखवून आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील  मोठा अनर्थ टळला. 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे, मुंबईवरून रिलायन्स कंपनीचा 25 हजार लिटर क्षमता असलेला पेट्रोलने भरलेला टँकर क्र. (एम.एच. 12 आर.एन. 6778) हा कोल्हापूरकडे जात असताना दि. 19 रोजी रात्री 11.15 दरम्यान शिरवळ गावच्या हद्दीत फुलमाळा नजीक महामार्गावर टँकरचा मागील टायर फुटून अचानक टँकरने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच आग पसरून टायर जळून खाक झाले. हे घडत असताना सदर टँकर कुठेही लिकेज झाला नाही. 

 

त्यामुळे टँकरमधील पेट्रोलला कोणतीही झळ पोहचली नाही. सदर घटनेचे वृत्त समजताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन सुरुवातीस स्थानिक पाण्याचे टँकर, एशियन पेंट कंपनीचा टँकर बोलवून स्वतः आग विझवणेस सुरुवात केली. त्यानंतर वाई व भोर या ठिकाणचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. 

 

सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यानच्या कालावधीत महामार्गावरील सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून पुढे वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. सदर घटनेची आकस्मित जळीत म्हणून शिरवळ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पांडुरंग हजारे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post