फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट
जिल्हाधिकारी डॉ. भोसले
यांनी केले तांत्रिक समितीचे गठन
। अहमदनगर । दि.29 एप्रिल । सध्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकिय व खाजगी रुग्णालयात कोविड रूग्ण मोठया संख्येने दाखल आहेत. उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचा पर्याप्त वापर, त्या प्रणालीची सुरक्षीतता याबरोबरच रुग्णालयातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर्व दक्षता घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी रूग्णालयांच्या फायर, स्ट्रक्चरल ऑडीट करणे कामी तांत्रीक समिती स्थापन केली आहे.
जिल्हयाचे पालक सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठन करण्यात आलेली ही समिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून समितीत इतर पाच वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समिती सदस्यांनी कोविड रुग्णालयांचे निर्देशीत मुद्याबाबत ऑडिट करावे आणि त्याचा एकत्रीत अहवाल समिती अध्यक्षांना सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले आहेत.
शासकिय व खाजगी कोविड रुग्णालयात मोठया संख्येने रुग्ण दाखल आहेत. उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पर्याप्त वापर व्हावा तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हयाचे पालक सचिव यांनी निर्देशीत केल्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शासकिय व खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थेच्या तपासणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रीक समिती स्थापन केली आहे.
या समितीत ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य डॉ. श्रीराम टेके, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सुनिल पोटे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, सार्वजनीक बांधकाम विभागाचे विद्युत उपअभियंता जे.एम. काळे आणि मनपाचे अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सदस्यांनी रुग्णालयांच्या फायर, स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल समिती अध्यक्षांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.