। मुंबई । दि.15 एप्रिल । खंडणीचा आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी नुकतीच संपली आहे. तब्बल साडेआठ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर त्यांना आज १४ एप्रिल रोजी सीबीआयने समन्स बजावले होते. त्यानुसार, अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली.
सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास ही चौकशी चालली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती.
त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे, सिंग यांचं पत्रं आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती. त्यावरून देशमुख यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या.
सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली. मात्र, या चौकशीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. तसेच देशमुख यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात आलं का? हे सुद्धा कळू शकलं नाही.
15 दिवसात अहवाल देणार?
दरम्यान, सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
