। अहमदनगर । दि.10 एप्रिल । देशासह राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत चालले आहेत. यावर नियंत्रण आनण्यासाठी सर्वच यंत्रणा काम करत आहे. यातच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोळे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून तातडीने भव्य तंबू ठोकून दोनशे रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या जागेवर शुक्रवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या 350 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे बेड कमी पडत आहेत.
या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार रोहित पवार यांनी आरोळे हॉस्पिटलच्या मालकीच्या जागेत मागील बाजूस तातडीने दोनशे कोरोना रुग्णांची व्यवस्था होईल, असा मोठा तंबू टाकण्यात येणार आहे.
यामध्ये वेगवेगळ्या खोल्या तयार करण्यात येणार आहेत. खाट, गादी असे बेड तयार केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शौचालयांची व बाथरूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सर्व व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांनी आजपर्यंत सेवा करत आहेत. तसेच यापुढे देखील या दोनशे रुग्णांची व्यवस्था होणे कामी आपले सर्व कर्मचारी सेवा करत आहे. जेवण ऑक्सीजनची व्यवस्था करणार आहेत. नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन येथील कर्मचारी सुलताना शेख यांनी केले.
यावेळी सभापती सूर्यकांत मोरे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सुलताना शेख, प्रकाश काळे, युवक शहर अध्यक्ष अमोल गिरमे, रतन काळे, सामाजिक रमेश आजबे, उमर कुरेशी, हरिभाऊ आजबे, प्रा. राहुल आहेर, इस्माईल सय्यद, काँग्रेसचे नेते जमिर सय्यद, दादासाहेब महाडिक आदी उपस्थित होते.
