। अहमदनगर । दि. 19 । दरोडा टाकण्याच्या तयारीत घातक शत्रासह अंधारात दबा धरुन बसलेली दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडली. ही कारवाई बुधवारी ( दि.१७ ) रात्री वाकडी गावच्या शिवारात वाकडी ते गोरेगाव रोड वरील पाटाच्या कडेला केली.
वाकडी गावचे शिवारातील हडोळा परिसरात वाकडी ते गोरेगाव रोडवर आडोशाला घातक शस्त्रसह काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली.
यावरून पोलिस निरीक्षक अनील कटके यांच्या पथकातील पोलिसांनी छापा टाकून शुभम अनिल काळे ( वय २१ रा. गणेश नगर राहता ) भरत उर्फ भऱ्या तानाजी काळे ( वय २२ रा.सप्तसुंगी देवी मंदिराजवळ गणेश नगर राहता ) यांना अटक केली.
या कारवाई दरम्यान अक्षय यशवंत आव्हाड' गणेश भिकाजी तेलोरे,( दोघे राहणार गणेश नगर राहता ) राहुल वाघमारे रा. रांजणगाव राहता ) हे तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आरोपीकडून एक रॉयल इन्फिल्ड बुलेट,एक बजाज पल्सर ( नंबर नसलेल्या ) एक गलोल, मिरची पावडर, दोन तलवारी असा ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,यांचे मार्गदर्शन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या
सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे पोलीस नाईक संतोष लोंढे शंकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ संदीप जंगले विनोद मासाळकर राहुल सोळंके रोहित मिसाळ चालक पोलीस हवालदार संभाजी कोतकर यांनी केली आहे.
