गाळेधारकांचे 8 महिन्यांचे भाडे माफ करा, आयुक्तांकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळासह गाळेधारकांची मागणी

। अहमदनगर । दि.02 मार्च । महानगरपालिकेची वसुली चालू असून गेल्या वर्षभर कोविड आजारामुळे व्यवसाय बंद होते, त्यामुळे गाळेधारकांना भाडे भरण्यास आर्थिक अडचणी येत आहे. 7 ते 8 महिन्यांचे भाडे माफ करावे तसेचे जुन्या गाळेभाडे प्रमाणे वसुल करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह गाळेधारकांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.


आयुक्तांना छाया टॉकीज गाळेधारक, सिद्धार्थ नगर येथील आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर, रंगभवन व दिल्लीगेट शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांच्या सह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी अल्ताफ शेख, शिरीष सब्बन, नंदकिशोर वधवा ,अनिल जग्गी, अशिष मेहता, गौैतम म्हस्के, तात्या शिंंदे, चंद्रकांत वजांरे, धनंजय आहेर, लहानु राऊत, नाथा वैराळ, अरिफ सय्यद,अजहर सय्यद, भाऊसाहेब नेटके,सतीय बत्तीन,  हमीदभाई, संजय चोपडा, रुपचंद परदेशी, सागर लोंखडे, विठ्ठल मेरगु आदि उपस्थित होते.  


याबाबत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अल्ताफ शेख यांच्यासह गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरात महापालिकेचे जवळपास 840 गाळे असून त्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून गाळेधारक व्यवसाय करत आहेत. महापालिकेने गेल्या 6-7 वर्षात भरमसाठ भाडेवाढ केली आहे. ती तब्बल 300-400 टक्के त्यामुळे गाळेधारक हैराण झाले आहेत.


याबाबत तोडगा काढण्यासाठी वारंवार महापालिका प्रशासन व पदाधिकार्यांशी चर्चा केलेली आहे. वेळोवेळी निवेदने दिली परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व्यावसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. गाळेधारक भाडे भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या भाड्यापैकी 7-8 महिन्यांचे भाडे माफ करावे व अन्य भाडे जुन्या दराने वसुल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

सर्व सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय करत असून झेरॉक्स ,स्टेशनरी,स्पेअर पार्टची दुकाने असून मोठे व्यापारी नाहीत, परंतु व्यापारासारखे भाडे आकारणी चालू आहे. कोविड आजारामुळे वर्षभर चर्चाच झाली नाही. दि.12 फेब्रुवारी रोजी ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. आयुक्तांनी सर्व गाळा भाडेवाढ यात स्वत: लक्ष घालावे व त्यावर तोडगा काढावा. त्याचप्रमाणे सध्या सर्व महानगरपालिकेची वसुली चालू आहे. गेल्या वर्षभर कोविड आजारामुळे व्यवसाय बंद होते, त्यामुळे आम्ही गाळे धारक भाडे भरण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या भाड्यापैकी 7 ते 8 महिन्यांचे भाडे माफ करावे तसेच जुन्या भाडे प्रमाणे वसुल करण्यात यावे अशी आमची मनपाकडे मागणी असल्याचे राजेंद्र दळवी यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post