। मुंबई । दि.27 फेब्रुवारी । चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे.
संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटतोय.
यामुळेच संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
पूजाच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा चित्रा वाघ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना धमक्यांचे फोन आले होते. दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.