। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । एका ऊसतोड मजुरावर तसेच दुसर्या एका घटनेमध्ये शेतमजूर महिलेवर बिट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना जिल्हयात घडल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शेळकेवाडी परिसरात मंगळवारी दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड कामगार जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी घारगाव येथील प्राथमिक केंद्रावर नेण्यात आले.
परसराम धर्माजी सोनवणे असे जखमी झालेल्या मजुराचे नांव आहे, ते युवराज काशिनाथ वायाळ यांच्या शेतात ऊस तोडण्याचे काम करीत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
त्यांना उसात ओढत नेले. मात्र, इतर मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. यात सोनवणे यांच्या हाताला जखमी झाली आहे.
दुसरी घटना श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथे घडली आहे. एका शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि महिलेला पाच फुटापर्यंत ओढत नले. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवनाथ आव्हाड यांची गाव परिसरात शेती असून त्यांच्या शेतात काम करणार्या अनिता भोसले यांना दुचाकीवरुन ते घरी सोडवण्यासाठी जात असताना बिबट्याने हल्ला केला. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बिबट्याने झडप घालत भोसले यांना ओढून नेले. यावेळी आव्हाड यांनी बिबट्याच्या दिशेने दगड फेकल्यामुळे भोसले यांची सुटका होऊ शकली. आव्हाड यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी मदतीला धावले.