। मुंबई । दि.11 फेब्रुवारी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आज शरद पवार यांची पहिल्यांदाच भेट घेतली. या भेटी दरम्यान मराठा अरक्षणाविषयी चर्चा झाली.
बैठकीनंतर उदयन राजे यांनी प्रसार माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारयांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे.
अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, असा गंभीर इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत.
महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
