अनेक शेतकर्यांची अडचण दूर
। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । नगर लुक्यातील डोंगरगण येथील गट नंबर 165 व 167 मधील शेत रस्ता व गाव नकाशा वरील रस्त्याच्या सामायिक वादात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत मोजणी करून रस्त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुला करण्यात आला.
सदर रस्त्यावर काही शेतकर्यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे अनेक वर्षापासून हा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता. शेतामध्ये रस्ता काढण्यासाठी मोजणी केल्यानंतर जेसीबीच्या साह्याने सदरील रस्ता खुला करण्यात आला. रस्ता खुला करत असताना संबंधित शेतकर्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
मात्र सदर रस्ता खुला करत असताना त्याला विरोध दर्शवीत काही महिला व पुरुष जेसीबीच्या आडवे आल्याने काही वेळ सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जेसीबीच्या आडवे आलेल्या नागरिकांना बाजूला करून रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरु ठेवली.
सदर रस्त्यावरून दोनशे शेतकर्यांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाला आहे. रस्ता खुला करण्यासाठी जेऊर मंडलाधिकारी, मौजे डोंगरगण तलाठी तसेच पोलिस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सर्व शेतकर्यांना रस्ता खुला करुन दिल्याबद्दल महसूल प्रशासनाचे स्थानिक शेतकर्यांनी आभार मानले.