वीटभट्टी कामगारांना स्मार्ट कार्डचे वितरण
। अमरावती । दि.07 फेब्रुवारी । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीटभट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली वीट बांधकामासाठी प्रथमत: उपयोगात येते. अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा,
यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे. ‘कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कामगारांच्या सुख-समृध्दीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज केले.
येथील महादेव खोरी परिसरातील वीटभट्ट्यांवर राज्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वीटभट्टी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे स्मार्ट कार्ड वितरीत केले. वऱ्हाड स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कामगार कल्याण आयुक्त विजयकांत पानबुडे, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश देठे यांच्यासह परिसरातील वीटभट्टी कामगार आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी संगणकासमोर बसून कामगारांची नोंदणी प्रक्रिया व स्मार्ट कार्ड निर्मिती कशी केल्या जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले. नोंदणी शिबिरात ममता पवार, राजेश वानखडे यांच्यासह अनेकांची नोंदणी करुन त्यांना प्रत्यक्षरित्या स्मार्ट कार्डचे वितरण राज्यमंत्र्यांचे हस्ते वितरित करण्यात आले. राज्यमंत्री कडू आणि वऱ्हाड संस्थेच्या पुढाकाराने प्रत्यक्ष वीटभट्टीवर येऊन त्याठिकाणी कामगार म्हणून नोंदणी होऊन स्मार्ट कार्ड मिळाल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसून आले.
