। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी । स्त्यावर पडलेल्या खडीवरून मोटारसायकल घसरून पडल्याने एकजण किरकोळ जखमी झाला. यावेळी जमलेल्या गर्दीतून दोघेजण पुढे येत त्यांनी जखमीस उपचारासाठी दवाखान्यात घेवून गेले.
मात्र प्रत्यक्षात त्या जखमीस उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याचे तर सोडाच मात्र त्याला रस्त्यातच सोडून देवून चक्क त्याचाच मोबाईल व मोटारसायकल घेूवन दोघेजण भामटे पसार झाले.
ही घटना येथील सक्कर चौकात घडली. याबाबत पांडुरंग शहाजी गायकवाड (रा.गवळीवाडा,रेल्वे स्टेशन अ.नगर) यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की,
पांडुरंग गायकवाड हे त्यांच्या मोटारसायकल (एमएच 16 बीक्यू 3680)जात असताना ते सक्कर चौकातून रेल्वे स्टेशनकडे वळले मात्र यावेळी रस्त्यावर पडलेल्या खडीवरून त्यांची मोटारसायकल घसरली व ते मोटारसायकलसह रस्त्यावर पडले.
त्यांना चक्कर येत असल्याने अस्वस्थ वाटत होते, दरम्यान गर्दीतील दोघेजण पुढे येत आम्ही त्यांचे नातेवाईक असून त्यांना दवाखान्यात घेवून जावे लागेल असे सांगत मोटारसायकलवर तिघेजण बसले व रेल्वे स्टेशनकडे घेवून गेले. यावेळी यातील एका भामट्याने फिर्यादी गायकवाड यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल काढून घेतला. त्यांना या रोडवरील लक्ष्मी मंदिरासमोर रोडवर सोडले.
यावेळी गायकवाड यांना काही कळण्यापूर्वीच वरील दोघेजण त्यांचा मोबाईल व मोटारसायकल घेवून पसार झाले. याबाबत पांडुरंग शहाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
