सावेडी नाट्यगृहाला गती ; 9 कोटींची प्रशासकीय मान्यता : आ.जगताप

। अहमदनगर ।  दि.20  फेब्रुवारी ।  सावेडी येथील मनपाच्या नाट्यगृहासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 8 कोटी 98 लाख 66 हजार 545 रूपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.


मनपाच्या सावेडी येथील जुन्या क्रीडा संकुलाच्या जागेत एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्याचे काम सुरू आहे. 2013-14 मध्ये मंजूर असलेल्या या पाचशे आसनी नाट्यगृहाच्या रचनेत बदल करून ते एक हजार आसनांचे करण्यात आले.


2015 मध्ये नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. मनपाला नाट्यगृह उभारणीसाठी सरकारने दोन कोटींचे अनुदान मंजूर करून त्यातील केवळ 60 लाख रूपये दिले होते. या निधीसह त्यावेळी शहरात जकात सुरू असताना संबंधित जकात ठेकेदाराकडून नाटयगृहासाठी घेतलेल्या दीड कोटीच्या रकमेतून नाटयगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.


पण, हा निधी संपल्यानंतर तब्बल दीड वर्षापासून सदर काम रखडले होते. रस्ते दुरूस्ती अनुदानातून निधी मिळाल्याने कामास पुन्हा सुरूवात झाली. त्यातून नाट्यगृहाच्या आसन व्यवस्थेसाठी स्लोपिंग स्लॅब टाकला गेला आहे. 25 फूट बाय 15 फुटाच्या स्टेजचे काम झाले आहे. स्टेज स्लॅबचे काम झाल्यानंतर खुर्च्या, फर्निचर, लाइट फिटींगचे काम सुरू करण्यात येणार आहे.


नगर शहरातील नाट्य रसिकांच्या जिव्हाळ्याच्या सावेडी नाट्यगृहाचे काम निधीअभावी रखडले होते. जिल्हाधिकार्‍यांनी 8 कोटी 98 लाख 66 हजार 545 रुपयांना प्रशासकीय मान्यता देऊन मनपास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या निधीचा प्रश्‍न सुटला आहे. आता झपाट्याने काम सुरू होणे गरजेचे आहे. अद्यायावत असे सावेडी नाट्यगृह नगरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.

                आ.संग्राम जगताप

Post a Comment

Previous Post Next Post