तुळजाभवानी मंदिर समितीचे दुष्काळग्रस्तांसाठी 3 कोटींचे योगदान

तुळजाभवानी मंदिर समितीचे दुष्काळग्रस्तांसाठी 3 कोटींचे योगदान

संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मंदिर संस्थानचा पुढाकार


। धाराशिव । दि.27 नोव्हेंबर 2026 । राज्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे.


मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक भागांमध्ये नागरिक, शेतकरी आणि पशुधनासमोर पाणीटंचाईसह विविध संकटे उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत मदतकार्याला हातभार लावण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानने आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला.

 

धार्मिक संस्थांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संकटकाळात समाजाच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्याच भावनेतून मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेले ३ कोटी रुपयांचे योगदान दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचविण्याच्या कार्यात उपयोगी ठरणार आहे.

 

समितीने सामाजिक बांधिलकी जपली
आई तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या श्रद्धेतून प्राप्त होणा-या निधीचा समाजहितासाठीही उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेतला, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post