। अहमदनगर । दि.27 जानेवारी । दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताकदिनी नगर शहरातून अ.भा. किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली. जय जवान, जय किसानच्या घोषणा देत ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले होते.
केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे, वीजबिल विधेयक 2020 व कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. सकाळी 11 वाजता मार्केटयार्ड येथे जमून ट्रॅक्टर तिरंगा रॅली नगर-पुणे महामार्गावर आली.
जुने बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज व मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात झाली. दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्या शेतकर्यांची दखल न घेणार्या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे विकास गेरंगे, धोंडीभाऊ सातपुते, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, हरजितसिंह वधवा, सुभाष तळेकर,
रावसाहेब निमसे, रमेश नागवडे, आनंद वायकर, अर्शद शेख, युनूस तांबटकर, संध्या मेढे, रामदास वागस्कर, सतीश पवार, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, समीक्षा वाकळे, समृध्दी वाकळे, भाऊसाहेब थोटे, रवींद्र फुलसौंदर, फारूक रंगरेज, कार्तिक पासळकर,तुषार सोनवणे, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
शहरातील नगर-पुणे महामार्गावरून कोठी, चांदणी चौक, कोठला मैदान, डीएसपी चौक ते तारकपूर मार्गे ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे संचलन होऊन पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंग स्मारक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.