। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीच्या खासगीकरणाचा डाव असून, त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी दिला आहे. दरम्यान, या रक्तपेढीतील अद्ययावत मशीनसाठीही कर्मचार्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अहमदनगर मनपाच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल येथे गेली अनेक वर्षे रक्तपेढी कार्यान्वित आहे. या सुविधेमध्ये फक्त रक्त घेता व देता येते म्हणून 2017 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी रक्तपेढीसाठी अद्ययावत 92 लाख रुपये किंमतीच्या कंपोनंट मशीन विशेष निधीतून दिल्या आहेत.
या मशीनमध्ये पेशी, प्लेटलेट, प्लाझमा असे रक्ताचे विभाजन करता येते. गोरगरीब जनतेला स्वस्तात रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी या मशिन दिल्या होत्या. परंतु, मनपाच्या आस्थापना शाखा व काही राजकारण्यांनी मिळून या मशीनसाठी जाणून-बुजून ऑपरेटर नियुक्त होऊ दिले नाहीत.
सुरुवातीपासूनच ही रक्तपेढी खाजगी संस्थेला देण्याचा डाव मनपा प्रशासनाने व राजकारण्यांनी आखला होता. रक्तपेढी प्रमुखांनी आयुक्तांना ऑपरेटर नियुक्तीसंदर्भात पत्र दिले आहेत. परंतु, आस्थापना शाखेने याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक केली आहे. ही पेढी खाजगी संस्थेला चालवायला देण्याचे षड्यंत्र रचले. त्यात मायकलवारसारखे भ्रष्ट आयुक्त मनपाला लाभले.
त्यांनी सेवानिवृत्त होता होता या सर्व कृत्याला हिरवा कंदिल दिला, असे समजते. मनपाने काही कर्मचारी नियुक्त केल्यास गोरगरीब जनतेचा निश्चितच फायदा होईल. परंतु, आर्थिक देवाण-घेवाण करून सदर रक्तपेढीचे खाजगीकरण करण्याचा डाव आहे.
सध्या आपल्याकडे मनपा आयुक्तचा पदभार असल्याने रक्तपेढीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी नेमणूक करून सदर कंपोनंट मशीन सुरू कराव्यात व रक्तपेढीचे खाजगीकरणाचा प्रस्ताव त्वरित रद्द करून जिल्ह्यातील वंचित व गोरगरीब जनतेस न्याय द्यावा. खासगीकरणाचा डाव रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही बारसे यांनी दिला आहे.
