। अहमदनगर । दि.18 जानेवारी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी कायद्यांबाबत केलेल्या मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
त्यादृष्टीने झालेल्या चर्चेत अण्णांनी केलेल्या सूचना केंद्रीय नेतृत्वाकडे पोहचविण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसदर्भात समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने आ.विखे पाटील यांनी अण्णा हजारे यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. राळेगण येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आ.विखे पाटील यांनी तब्बल दोन तास चर्चा केली.
यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, स्वामिनाथन आयोग, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा, या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान आ. विखे पाटील यांनी अण्णा हजारे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलणेही करुन दिले.
पुढील आठवड्यात याबाबत चर्चेची पुढची फेरी होणार असून, यासाठी स्वत: फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील यांनी अण्णांबरोबर झत्तलेली चर्चा ही सकारात्मक झाली असल्याची माहिती दिली.
कृषी क्षेत्राशी संबधित त्यांनी केलेल्या सर्वच सूचना या केंद्रीय नेतृत्वापर्यंत आम्ही पोहचविणार आहोत. या चर्चेतूनच यशस्वी मार्ग निश्चित निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
