पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने


नगर, (दि.12 डिसेंबर) : शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला.


याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, गिरिष जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, शाम नळकांडे, मदन आढाव, दत्ता जाधव, रमेश परतानी, राजेंद्र भगत, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, रवींद्र वाकळे, दिपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.


याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे, प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे, त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जनता आर्थिक संकटात सापडली असून, त्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहे. यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असे सांगितले.


याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना चिनी-पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेत. अन्नदात्त्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचाही अनादर केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांचा सर्वसामान्यांला मोठा फटका बसत असून, सर्वत्र दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. याचा निषेध करुन दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. यावेळी शिवसैनिकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी आणून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार व ना.रावसाहेब दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

 

 ना.रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस फासले काळे


 

Post a Comment

Previous Post Next Post