नगर, (दि.30 डिसेंबर) : कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नाशिकमध्ये अटक केली आहे. दि.11 नोव्हेंबर रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय संभाजी पाठक यांना मारहाण करून त्यांच्याकडील दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा 17 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार पोहेकॉ सखाराम मोटे, विश्वास बेरड, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाने, मयूर गायकवाड, सागर ससाणे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने नाशिक येथे जावून आरोपी करण सोमनाथ रोकडे (वय 30, रा.शिवनगर झोपडपट्टी, आडगाव, ता.जि.नाशिक) याला ताब्यात घेतले.
त्याने चोरीचा मोबाईल जॉन चलन पडेची, साहिल सुरेश म्हस्के उर्फ मोन्या पाईकराव, हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोन्या पाईकराव यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. सदर तीनही आरोपी नाशिकमधील एका गुन्हयाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्याचे आढळले आहेत. पोलिसांनी आरोपी रोकडे याला ताब्यात घेवून भिंगार कॅम्प पोलिसांकडे सुपुर्द केले आहे.