सर्वांगीण विकासासाठी राजयोगा जीवन पद्धती उपयुक्त : डॉ.सुधा कांकरिया

सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये राजयोगा मेडिटेशन कोर्सची सांगता


नगर, (दि.13 डिसेंबर) :आजकाल सर्वांचे दैनंदिन जीवनमानात ताण-तणाव वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या कामावर त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यावर न कळत होत आहे. यातून प्रत्येकाला मन:शांतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत राजयोग मिडिटेशन कोर्स हा आपले वैयक्तिक, कौटूंबिक व शैक्षणिक जीवनमान उंचविण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये सांगितलेल्या उपायांमुळे मनुष्यात अंतरिक बदल होऊन नकारात्मक विचार जाऊन तो सकारात्मकतेकडे वळतो. त्यामुळे सभोवातलची परिस्थितीही त्यास अनुकूल वाटू लागते. जीवनात चैतन्य निर्माण होऊ आयुष्य हे सुंदर वाटू लागते. त्यामुळे राजयोग मेडिटेशन हे आपल्या जीवन पद्धतीसाठी उपायुक्त टॉनिक असल्याचे प्रतिपादन राजयोगिनी बीके डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.


सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स घेण्यात आला. राजयोगिनी बीके डॉ. सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.  अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे हे होते समवेत प्रमुख पाहुणे सेक्रेटरी र.धों. कासवा, खजिनदार अ‍ॅड. विजय मुनोत, विश्‍वस्त मनसुखलाल पिपाडा व रमणलाल गांधी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी  मेडिटेशन आपल्या जीवनावर कसे सकारात्मक परिणाम करते जीवनाच्या प्रत्येक वळणावर मेडिटेशन सहायक ठरते. जीवन निरोगी आनंदी व समृद्ध बनण्याची राजयोगा मेडिटेशन ही जीवन पद्धती आहे. तिचा अवलंब सर्वांनी केला पाहिजे.


याप्रसंगी र.धों.कासवा म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. सध्याच्या मानसिक व शारिरिक ताण-तणावाच्या वातावरणात शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी राजयोग मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले आहे, त्यामुळे शिक्षकांना तणावमुक्तीचा अनुभव मिळाल्याचे सांगितले.


अ‍ॅड.विजय मुनोत म्हणाले की, मेडिटेशनमुळे मनाची व बुद्धीची शुद्धता होते. त्यामुळे जीवनातील निर्णय शक्ती बळकट होण्यास मदत होते तसेच ताण तणाव घालवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.


सुरुवातीस मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.  जयश्री कोदे यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर भाकरे, निता लांडगे, अनिता बेरड व निशा दुशिंग यांनी अनुभव व्यक्त केले. वर्षा गोरे यांनी आभार मानले. विनोदकुमार कटारिया व प्रिया सोनटक्के यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post