नगर, (दि.03 डिसेंबर) : नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे टाळत आहेत. सध्या लोडशेडींगमुळे रात्रीच वीज पुरवठा होत असून बिबट्याचा उपद्रव लक्षात घेऊन महावितरणने दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने केली.
आघाडीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर, नगर पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, वाल्मिक नागवडे, विजय जाधव, सरपंच जनार्दन माने, महेंद्र शेळके, दत्तू शेळके, पंचायत समिती सदस्य संदीप गुंड, मधुकर म्हस्के, नवनाथ वायळ आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. तालुक्यात रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. बिबट्याच्या भीतीपोटी अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे टाळले जात आहे. त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. यासाठी विजेच्या वेळापत्रकात बदल करून रात्रीऐवजी दिवसा सायंकाळी ६ वाजेपर्यंत किमान पाच तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.
