नगर, (दि.29 डिसेंबर) : भंडारदरा धरणाच्या गेट खालील एका खड्डयातील शेवाळावरुन पाय घसरुन 15 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गर्दनी येथे रविवारी दुपारी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, जिल्हयातील भंडारदरा धरणाच्या ठिकाणी मयत मुलगा व त्याची आई, वडील, भाऊ तसेच त्याच्या मामाची मुलगी असे फिरण्यासाठी म्हणून गेले होते. या सर्वांनी येथील जलाशयात बोटिंग केली .
यानंतर काही वेळातच त्या मुलाचे वडिल हे त्यांच्या मित्राकडे गेले. तेथे जेवण केले. जेवण झाल्यावर ही मुले धरणाच्या स्पीलवे गेट खालील खडकावर फिरण्यासाठी गेले. यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात या मुलाचा पाय घसरला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
पाय घसरल्याने मुलाच्या नाका तोंडात पाणी गेले. यानंतर त्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा दुर्देवी अंत झाला होता. राजूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्रूची नोंद केली आहे.