नगर, (दि.29 नोव्हेंबर) : दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा 2800 ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला.
कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
महिनाभर कांद्याचे दर सहा ते सात हजारापर्यंत तेजीत होते. परंतु दिवाळीनंतर कांद्याच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली. शनिवारी वांबोरी उपबाजारात एक नंबर कांदा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला.
काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आता शेतकर्यांना रडवत आहे. दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. ऐतिहासिक भावाची मजल मारणारा कांदा आता मातीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे.
