नगर, (दि.28 नोव्हेंबर) : शहरातील नागरिकांच्या तक्रारी मार्गी लागत नसल्याने शास्तीमाफीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर मालन ढोणे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत एकरकमी भरणा केल्यास शास्तीमाफीचा निर्णय झाला आहे. त्याला नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रांगेत उभे राहून घरपट्टीचा भरणा केला जात आहे. त्यामुळे पालिकेसह हातभार लागत आहे.
परंतु, बर्याच नागरिकांच्या घरपट्टीबाबत तक्रारी आहेत. त्यामध्ये घरपट्टीची फाळणी करणे, नळ कनेक्शन नसतानाही पाणीपट्टी आकारणी करणे. एकाच कुळाचे चार भाऊ वेगवेगळी घरपट्टी भरण्यास तयार असतानाही त्यांच्या हिश्याप्रमाणे फाळणी न झाल्यामुळे घरपट्टी भरण्यास अडचणी निर्माण होत आहे.
याबाबत अर्ज केल्यानंतरही निर्णय होत नसल्याने शास्तीमाफीचा लाभ मिळत नाही. वसुली लिपिक, कर निरीक्षक, मूल्यनिर्धारतण व कर संकलन अधिकारी तसेच उपायुक्त यांना भेटूनही समस्या मार्गी लागत नसल्याचे दिसते.
त्यामुळे घरपट्टी वसुलीची थकबाकी वाढत चालली आहे. त्यामुळे शास्तीमाफीची मुदत वाढविणे आवश्यक आहे. संगणक प्रणालीमध्ये रोख अथवा चेकची एकच पावती असल्याने वसुलीस अडथळे निर्माण होत असल्याने या प्रणालीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे उपमहापौर ढोणे व नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी म्हटले आहे.
