शहराच्या आसपासच्या गावामध्ये सध्या हिंस्र बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनेक जनावरे, लहान निरपराध मुले, नागरिकांना त्याने आपले भक्ष केले असून हे प्राणी आपल्या भक्षाच्या शोधात लांब लांब भटकत असतात. नुकतेच शहरापासून जवळ असलेल्या चांदबिबी महालावर बिबटे नागरिकांच्या नजरेस पडले. त्याचे व्हिडिओ चित्रण ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
खरेतर आपल्या शहरवासियांच्या दृष्टिने ही चिंताजनक बाब असून बिबटे भक्षाच्या शोधात आपल्या शहरामध्येही येऊ शकतात. शहराच्या आसपास असलेली उपनगरे अतिशय विरळ असून अगदी महामार्गा जवळ वसलेली आहेत. भल्या पहाटे अंधार असताना शहराच्या विविध भागात पाणी सुटतं असते. महिला वर्ग मोठया प्रमाणात पाणी भरायला उपस्थित असतो.
येत्या काही दिवसातील बिबट्याच्या घटना पाहता महापालिकेने सध्यातरी भल्या पहाटेची पाणी सोडण्याची वेळ बदलावी. व काळजी घ्यावी अशी विनंती माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना केली आहे.
