नगर,(दि.08 नोव्हेंबर) : शनिवार दि 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 9 वा. सुमारास निलगिरी हॉटेल नजीक, नगर - दौंड रोडवरील घारगाव शिवारात दौंड कडे जाणारा ट्रकने नगरकडे येणारी बोलेरो जीप (एमएच 17 ऐ एन. 0052) ला जोरदार धडक दिल्याने ट्रक रोडच्या कडेला खड्डयामध्ये पलटी होऊन जीप ट्रक खाली दबली गेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. क्रेन उपलब्ध करून प्रथम ट्रक बाजूला काढला व नंतर जीप बाजूला घेतली असता दोन व्यक्ती आतमध्ये अडकल्याचे आढळून आले. गॅस कटर, ट्रॅक्टर तसेच स्थानिक तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले.
प्रभाकर निवृत्ती लोंढे, (वय 57, निरीक्षक माथाडी कामगार मंडळ) व त्यांचा चालक अशोक पुंजबा औटी,( वय 48) हे दोघेही राहणार अहमदनगर येथील असुन सदरची जीप महाराष्ट्र शासन माथाडी कामगार मंडळाची असून ते राशीन वरून नगरला जात होते. पोलीस पथक पो.नि. माने, पीएसआय बोराडे, एएसआय गवळी, हेड कॉस्टेबल शिंदे संभाजी, ज्ञानेश्वर पठारे, नंदकुमार पठारे, चालक भाऊ शिंदे, धांडे, भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट देवून कार्यवाही केली.
