कोल्हापूर, (दि.22 नोव्हेंबर) : जम्मूमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाले आहे. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली.
आठ दिवसांपूूर्वी ऐन दिवाळीतच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषिकेश जोंधळे यास वीरमरण आले होते. दिवाळी दिवशीच त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान जम्मूमध्ये शहीद झाला आहे.
शहीद जवान संग्राम पाटील हा सैन्यदलातील 16 ‘मराठा बटालियन’ मध्ये कार्यरत होते. अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झालेले संग्राम यांची 17 वर्षांची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देशसेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्यांनी मुदत वाढवून घेतली होती. पण शुक्रवारी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
