नगर, (दि.01 नोव्हेंबर ) : चार अनोळखी इसमांनी बळजबरीने घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवून घरामधील 22 ग्रॅम सोन्याचे दागीने व 1 लाख रुपये असा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना केडगाव येथील मराठानगर उपनगरात शनिवारी (दि.31) रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शैलेश भाऊलाल ठाकूर (वय 28, रा.महादेवाच्या मंदिरासमोर, मराठानगर, केडगाव, नगर) हे त्यांच्या कुटुंबियांसह घरात झोपले होते. पहाटे अडीचच्या दरम्यान त्यांचा भाऊ देवील याने दरवाजा वाजवून त्यांना उठवले. शैलेश यांनी दरवाजा उघडला असता समोर त्यांचा भाऊ, भावजय व सोबत चार अनोळखी इसमर होते. त्यातील एकाने देवीज याचा मुलगा दक्षराज (वय 5) याच्या गळ्याला चाकू लावलेला होता. त्यातील एकाने आरडाओरड करु नकोस नाहीतर इथूनच कापून टाकीन असा दम दिला.
चोरट्यांनी त्यांच्या बेडरुममध्ये घूसून उचकापाचक करुन कपाटातील 3 ग्रॅम वजनाची कानातील वाळी, 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4 ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, 2 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 6 ग्रॅम वजनाच्या दोन साखळ्या, 2 ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या दोन साखळ्या, 2 ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या आंगठ्या व 1 लाख रुपये रोख असा एक लाख 66 हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला आहे. याबाबत शैलेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलिस सपोनी रणदिवे करत आहे.
